नवी दिल्ली: महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार शनिवारी दिल्लीत होते. मात्र, या दौऱ्यात निवासी आयुक्तालयाने त्यांना शासकीय गाडी दिली नाही. यामुळे वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाच्या सोयी-सुविधा सरकारकडून पुरविल्या जातात. मुख्यमंत्री यांच्यानंतरचे ते सर्वात मोठे घटनात्मक पद आहे. मात्र, शनिवारी दौऱ्यावर दिल्लीत आले असताना निवासी आयुक्तालयाकडून वडेट्टीवार यांची उपेक्षा करण्यात आली.
विरोधी पक्ष नेत्यांना प्रोटोकॉलनुसार, निवासी आयुक्तालयाने शासकीय गाडी पुरवायला हवी होती. मात्र, त्यांना प्रायव्हेट गाडी दिली गेली. जेव्हा की, सरकारी गाडी पुरविणे गरजेचे होते. यावर वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निवासी आयुक्तालयाच्या अधिकारी स्मिता शेलार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून १० न्यायाधीश दिल्लीत आले आहेत. ते सदनात थांबले आहेत आणि त्यांना शासकीय गाडी देण्यात आली होती. या गाडीचा नंबर सर्वोच्च न्यायालयात देण्यात आला होता. वडेट्टीवार यांचा कार्यक्रम रात्री ११ च्या सुमारास झाला. यामुळे, ऐनवेळी आम्हाला काहीही करता आले नाही. या कारणामुळे त्यांना शासकीय गाडी पुरवू शकलो नाही. मात्र, दुसरी गाडी देण्यात आली. गाडी व्यतिरिक्त सर्व प्रोटोकॉल देण्यात आला होता, असे शेलार यांनी सांगितले.
वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. दिल्लीत त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील भांडणाचा मुद्दा काँग्रेस मुख्यालयात पोहचला आहे. मात्र, या मुद्यावर शनिवारी काहीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील इजा, बिजा, तिजाचे सरकार महाराष्ट्राला लुटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात कमिशन खाणारे हे भाजपचे लोक आहेत. ३२ कोटी कोणी खाल्ले, याचा शोध घेण्यासाठी चौकशीची गरज आहे. हे कमिशनखोर, डाकू, लुटारू यांचे सरकार आहे. लुटारूंची टोळी या राज्यावर बसली आहे. केंद्रीय कृषिमंत्री तेलंगणा, आंध्रामध्ये जाऊन तिथे पॅकेज जाहीर करतात. महाराष्ट्रात नुकसान झाले नव्हते का? असा सवालही त्यांनी केला.