मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 9 जुलैला आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी स्वत: दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे, विनायक राऊत आदी नेते उपस्थित होते.
वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता स्वत: वसंत मोरे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता ते विधानसभेत नशीब आजमावणार आहेत.
यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले, 9 जुलै रोजी माझा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्विकारलं नाही. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होत आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडवे आव्हान देऊ.