अजित जगताप
Vaduj News वडूज : सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा अखेर निकाल जाहिर झाला. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने बहुमत प्राप्त केले असून सोसायटी मतदार संघातील ११ व इतर २ अशा १३ ठिकाणी विजय संपादन केला.
राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाच जागेवर समाधान मानावे लागले. विजयाची खात्री पटताच माजी आमदार घार्गे समर्थक तसेच भाजप, काँग्रेस व मित्र पक्षाने जल्लोष केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे यांनी एकट्याने खिंड लढवून पाच जागेवर विजय संपादन केला. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोलाची साथ लाभली .
विजय घोषित केल्यानंतर वातावरण शांत…!
मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मतदारसंघात शैलेंद्र रामचंद्र वाघमारे यांना ५४३ व त्यांचे प्रतिस्पर्धी अमरजीत सत्यवान कांबळे यांना ५४० मते मिळाल्यामुळे फेर मोजणी घेण्यात आली. त्यामध्ये आणखीन एक मताची वाढ झाली तर या ठिकाणी २२ मते बाद झाली. अखेर वाघमारे यांना विजय घोषित केल्यानंतर वातावरण शांत झाले.
फेर मतमोजणीसाठी दहा हजार रुपये रक्कम जमा करावी लागली. परंतु, एकमताची वाढ झाल्यामुळे दोष कोणाचा? याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. फेर मतमोजणीमध्ये दोष आढळल्यास सदरची रक्कम परत द्यावी की नाही? याबद्दल अनेक मत मतांतर होऊ लागलेले आहेत.
या मतमोजणीच्या वेळेला सोसायटी मतदारसंघातून खटाव विकास आघाडीचे महेश घार्गे ६३६, अभिजीत देशमुख ६२६, ज्ञानेश्वर नलवडे ६१७, दत्तात्रय पवार ६१६, राहुल फडतरे ६४७, सुनील फडतरे ६१२, विजयकुमार शिंदे ६०२, महिला राखीव दत्ता जगदाळे ६४७, सुनिता मगर ६२५ इतर मागासवर्गीय दीपक विधाते ६५६, ग्रामपंचायत मतदार संघातून अण्णा वलेकर ५३६, आर्थिक दुर्बल विनोद घारगे ५४५ हे खटाव विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
विमुक्त जाती जमाती शरद पाटील ६२५ मतदारसंघात ५३९ अनुसूचित जाती जमाती शैलेंद्र वाघमारे ५४४, ग्रामपंचायत मतदार संघ अभिजीत जाधव ५३९, व्यापारी आर्थिक मतदारसंघ संकेत मामाने ४२६, गिरीश शहा ४२४ हमाल मापाडी स्वप्निल गाडगे ३९५ अशी मते मिळाली.
सोसायटी मतदार संघात एकूण १२६५ मतदार होते. त्यापैकी १२२८ मतदान झाले. ३७ मते बाद ठरली महिला राखीव मध्ये १२५२ मतदार मतं झाली 13 मते बाद झाली. इतर मागासवर्गीयमध्ये १२५० मतदान झाले १५ मते बाद ठरली. भटक्या राखीव मध्ये १२१६ मतदान झाले ४९ मते बाद झाली ग्रामपंचायत मध्ये १०८३ मते २३ मते बाद झाली. अनुसूचित जमातीमध्ये १०८४ जणांनी मतदान केले. २२ मते बाद झाली आर्थिक दृष्ट्या निर्मूलनमध्ये १०८२ मतदान व २४ मते बाद झाली व्यापारी अडत्यांमध्ये ७०२ मतदान झाले ४ मते बाद ठरली हमाल मापाडी मध्ये ६९९ मतदान झाले १९ मते बाद ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे, नायब तहसीलदार सचिन कर्णे यांनी काम पाहिले.
निकाल जाहीर होतात कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलालाची उधळण केली. अपेक्षा नुसार खटाव विकास आघाडीला यश मिळाल्यामुळे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मस्तकावर दुहेरी मुकुट आलेला आहे. यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी यश संपादन केले होते त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले असून तिसऱ्यांदा ते काय चमत्कार करतात ?याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.