(Uruli Kanchan) उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन मधील थेऊर- नायगाव- उरुळी कांचन येथील रस्त्याचे काम सोमवारी (ता. २७) सुरु झाले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव कांचन कॉलेज ते बायफ संस्थेच्या गेट पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण कामासंदर्भात अनेक दिवसांपासून उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजय भोसले यांना या कामासंदर्भात निवेदनही दिले होते.
याबाबत कामाला दिरंगाई करणाऱ्या मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर कंपनीला प्रतिदिन ५ हजार रुपये विलंब भरपाई आकारणीचा प्रस्ताव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केला आहे. नुकसान भरपाईच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय आल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी पदाधिकाऱ्यांना दिली होती.
तीव्र आंदोलन करण्याचा दिला होता इशारा…!
दरम्यान, उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी या रस्त्याच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत होते. डांबरीकरणाचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यानी दिला होता. त्यानुसार सोमवारी (ता. २७) काम सुरु झाल्याने उरुळी कांचन येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पुजा सणस, हवेली तालुका झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, उरुळी कांचन शहर भाजप शहराध्यक्ष अमित कांचन, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गणेश घाडगे, मानसी भुजबळ व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.