Uruli Kanchan उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील सरपंच पदाच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरपंच विठ्ठल शितोळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला होता. मात्र शितोळे यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्यानुसार न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत सरपंच पदाची निवडणूक घेण्यास स्थगिती देण्यात यावी असा आदेश दिला आहे.
विवाद अर्ज दाखल…!
कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्यावर संमत झालेला अविश्वास ठराव मान्य नसल्याने विवाद अर्ज दाखल केला होता. विवाद अर्जाच्या अनुषंगाने अर्जदार व जाबदेणार यांना त्यांचे लेखी म्हणणे मांडणेकामी व कागदोपत्री पुरावे सादर करणेकामी नोटीसा काढून पुरेशी संधी देण्यात आली होती. दिलेल्या निर्णयानुसार अर्जदार विठ्ठल राजाराम शितोळे यांचा विवाद अर्ज फेटाळण्यात आला होता.
विवाद अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक बुधवारी (ता. ०५) घेण्यात येणार होती. तसा आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आला होता. त्यानुसार दिलेला निर्णय विठ्ठल शितोळे यांना मान्य नसल्याने त्यांनी या कार्यालयाकडील आदेशाविरुध्द उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल केली होती.
दरम्यान, सदर प्रकरणी उच्च न्यायालय, मुंबई येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी सोमवारी (ता. ०३) दिलेल्या तोंडी निर्देशानुसार ग्रामपंचायत कोरेगांव मुळ, (ता. हवेली) येथील बुधवारी (ता. ०५) घेण्यात येणारी सरपंच पदाची निवडणूक न घेणेबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत.