पुणे : पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या रविवारी (ता. २०) सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
तसेच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसृष्टी प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडाचे लोकार्पण शहा करणार आहेत. सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड-किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका आदी प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत.