सुरेश घाडगे
परंडा : सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री शिवसेना नेते प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी परंडा विधानसभा मतदार संघात विविध कामांसाठी भरघोस विकास निधी आणल्यामुळे विविध पक्षातील विशेषतः कठोर विरोधक सुद्धा मेनासारखे मऊ होऊन तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या परंडा तालुक्यातील एकेकाळच्या कट्टर विरोधकांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. याची नेमकी खबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राहूल मोटे यांना ही उमगली असून त्यांनी सावध पवित्रा घेवून विशेषतः परंडा शहरातील पक्ष बांधणीला नुकत्याच झालेल्या शरद संवाद कार्यक्रमातून सुरु केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कांही पदाधिकारी व त्यांचे समर्थक फुटून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.
या प्रवेशाची बिजे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका मोठ्या निधीच्या विकास कामाच्या उदघाटनात पेरली गेली होती. अनेकांनी बाळाचे पाय पाळण्यात या म्हणीप्रमाणे अंदाज ही बांधले होते. त्यामुळे हा बांधलेला अंदाज परंडावासीयांसमोर प्रत्यक्षात लवकरच उतरणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकारी कार्यकर्ते आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत तर नेते विधानसभा व लोकसभा मतदारसंघ मजबुत करण्यासाठी कामाला लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने तानाजी सावंत आग्रेसर असून त्यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी जोरदार कार्य सुरु केले आहे.
मतदारसंघातील आरोग्य तसेच रस्ते, पुल, गाव व शहर रस्ते, वीज, पाणी यांसह विविध विकास कामांसाठी निधी आणुन कामाला सुरुवात केलेली आहे. यामुळे अनेक विरोधक भुलले आहेत. राष्ट्रवादीसह, काँग्रेस, भाजप व शिवसेना (उ.बा.ठा.) या प्रमुख पक्षांसह विविध पक्ष व संघटना मधील पदाधिकारी , कार्यकर्ते शिवसेनेत जाण्यास इच्छूक असल्याचे व तानाजी सावंत यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा असून पक्षप्रवेश कधी करणार याकडे लक्ष वेधले आहे.
तानाजी सावंत येईल त्याला प्रवेश व त्याचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यामुळे इतर पक्षांना धडकी भरली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राहूल मोटे, शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या समोर पक्ष फुट व बांधणीचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.