पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव प्रवीण घुगे आणि औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय अवताडे उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबईत आले तर त्यामध्ये ठाकरे यांना चुकीचे वाटण्याचे कारण नाही. अमित शाह हे उद्धव ठाकरे यांचा कधी उल्लेखही करत नाहीत. त्यांचे नाव घेऊन टीका करण्याने उद्धव ठाकरे यांनी जे गमावले आहे ते परत येणार नाही. उलट एक दिवस उद्धवजींची अवस्था माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी होईल की आणि केवळ चारच जण उरतील. उरलेले थोडे आमदार त्यांनी सांभाळावेत नाही तर मुख्यमंत्री शिंदे त्यांना कधी नेतील कळणारही नाही.
यापुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी २९४ सरपंच भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. आपल्याकडे त्यांची नाव व पक्षातील पदांसहीत पूर्ण माहिती आहे. त्याखेरीज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४१ सरपंच निवडून आले आहेत. अशा प्रकारे ६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजपा – शिवसेना युतीचे आहेत. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष दावे करत आहेत त्यांना आपले आव्हान आहे की, त्यांनी सविस्तर यादी द्यावी. त्याचबरोबर आम्हीही देऊ.
भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्व ९७, ५०७ बूथमध्ये पक्ष संघटना बळकट करत असून आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आमच्या विरोधात तीनही पक्ष एक झाले तरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान ४५ आणि विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर विजय मिळवू.
मराठवाडा आणि विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळांना महाविकास आघाडी सरकारने मुदतवाढ दिली नाही हे त्या आघाडीचे मोठे षडयंत्र होते. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल महोदय बारा आमदार देत नाहीत तोपर्यंत वैधानिक विकास मंडळ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण शिंदे फडणवीस सरकारने मात्र सत्तेवर आल्यानंतर लगेचच मराठवाड्याच्या विकासासाठी काम सुरू केले आहे.
मराठवाडा वॉटरग्रीड आणि समुद्रात जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे या कामांवर शिंदे – फडणवीस सरकारने भर दिला आहे, याबद्दल सरकारचे अभिनंदन केले पाहिजे.भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्या नाराज नाहीत. त्या खंबीरपणे पक्षाचे काम करत आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल कपोलकल्पित बातम्या प्रसिद्ध करून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न होत आहे.