कोपरगाव : मला सत्तेची चिंता नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. कारण सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार”, असा शब्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंख्यमंत्री पदाबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या राजकीय घडामोडीही जोरदार सुरु आहेत. त्यात प्रत्येक पक्षाचे नेते निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका, सभा आणि दौरे करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. आजपासून ते शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घ्यायला गेलो होतो. माझ्या बहिणींना आणि भावांना न्याय द्या, त्यांना ताकद द्या, असं साकडं घातलं. आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. कारण तुमचा हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही. मी विचार करत बसलोय की, तुम्ही मला काय म्हणून बोलावलं? माझा येथे उल्लेख झाला की, माजी मुख्यमंत्री, माझा पक्ष चोरला. चिन्ह चोरलं आणि वडील देखील चोरले आहेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागत आहात.
ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्री होतो आता माजी झालो आहे. अनेकजण मंत्री होतात अन् जातात. आम्ही कंत्राटी कामगार आहोत, तुम्ही पर्मनंन्ट आहात. तुम्ही सगळेच माझी सत्ता आहात. त्यामुळे तेव्हाही मला मुख्यमंत्रीपदाची पर्वा नव्हती आणि आताही नाहीयेय.