पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात पुण्यात १३ डिसेंबरला सर्व पक्षीय नेत्यांनी आणि सामाजिक संस्थांनी बंदची हाक दिली आहे. पुणे व्यापारी महासंघ देखील या बंदमध्ये आता सहभागी होणार आहे. सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन संभाजी बिग्रेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआए इत्यादी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेऊन करण्यात आले होते.
त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये त्यांच्या आवाहनावर चर्चा करुन पुणे बंदमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात काही दिवसांपासून राज्यपालांविरोधात अनेक निषेध आंदोलनं केली जात आहेत. त्यात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत निषेध नोंदवला होता. मात्र आता पुण्यातील सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आले आहेत आणि त्यांनी बंदची हाक दिली आहे.