राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन दरबारी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट तलावांचे फेरसर्वेक्षण करून अधिक तलाव समाविष्ट करण्यात यावेत यासाठी पाठपुरावा करत असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेत समाविष्ट असलेल्या बोरीऐंदी, बोरीभडक, डाळिंब, भरतगाव, ताम्हणवाडी, कासुर्डी, यवत, खोर, भांडगाव, देऊळगाव गाडा, पडवी, वासुंदे, रोटी, कुसेगाव, जिरेगाव, हिंगणीगाडा, कौठडी आदी गावांतील शेतकरी व संबंधित दोन्ही उपसा सिंचन योजनांचे अधिकारी यांची एकत्रित बैठक यवत येथे पार पडली यावेळी कुल बोलत होते.
यावेळी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील विविध अडचणी, समस्या आदींबाबत तसेच उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी यापूर्वी भरण्यात येणारे नियोजन तलाव, योजनेत समाविष्ट नसलेले परंतु भरले जाणारे तलाव समाविष्ट करणे व नव्याने समाविष्ट करण्यात येणारे तलाव याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांच्या विविध सूचना मागण्यांची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशहि संबंधितांना देण्यात आले.