पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुर्डूवाडीला येऊ नये म्हणून त्यांना धमकीचा फोन आला होता. फोन करणारी व्यक्ती कोण आहे? त्याने ही धमकी का दिली? याची माहिती सध्या मिळू शकलेली नाही. पोलिस त्याची चौकशी करीत आहेत. मात्र या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी हा नियोजित कुर्डूवाडी दौरा पूर्ण केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती तसेच विधानसभेचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं.
आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूंकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. माढा तालुक्यात बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांचं मोठे वर्चस्व आहे. सध्या ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते पण ऐनवेळी त्यांनी शरद पवार यांना कार्यक्रमाला बोलाविल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
शरद पवार यांना कुर्डूवाडी दौऱ्यावर येऊ नका, अशा आशयाचा धमकीचा फोन आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत दौऱ्यावर जाऊ नका, कुर्डूवाडी दौरा टाळा, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना फोनवर दिली. मात्र या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी हा नियोजित कुर्डूवाडी दौरा पूर्ण केला आहे.
दरम्यान, फोन करणारी व्यक्ती कोण आहे आणि ही धमकी त्याने का दिली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पवारांना धमकी दिल्याच्या वृत्ताबाबत अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.