पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू- तुळापूर येथील स्मारक विकास आराखड्यास स्थगिती दिल्याची चर्चा होती. मात्र, तीर्थक्षेत्र विकासात अडथळा होईल, असा कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेतलेला नाही, असा दुजोराच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याचा दौरा केला. पुण्यातील विधान भवन येथे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला स्थगिती दिल्याची चर्चा असून, शिवप्रेमींकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे,याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वढू- तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा विकास आराखडा मंजूर झाला असून, त्याला अडथळा होईल, असा कोणताही निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विकास आराखड्यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका…
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे, भव्य, प्रेरणादायी स्मारक शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसेच तुळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका ठेवली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.