नागपूर : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन हे १९ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार असून महापुरुष आणि त्यांच्यावर झालेल्या टिपणीमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्य विधीमंडळाच्या या सत्रातील पहिल्या आठवड्यात महत्वाचे प्रश्न आणि वादग्रस्त प्रकाराने यावर चर्चा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यामुळे यावर राज्य सरकार कशा प्रकारे पावित्रा घेताना कामकाज पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
राज्यपालांचे विधान हेच सर्वात मोठा चर्चा होणारा आणि वादग्रस्त मुद्दा ठरण्याची शक्यता असणार आहे. यावरच आज पुण्यामध्ये विरोधी पक्षाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे याचे परिणाम विधिमंडळात कसे पडतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.
प्रचलित नियमानुसार दुसऱ्या आठवड्यामध्ये शासकीय कामकाज जास्त असण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्य सरकारने केलेले काम मांडण्याची शक्यता आहे. त्याबरोबरीने राज्य सरकार कोणत्या नवीन योजना घेऊन येणार यावर देखील लक्ष ठेवणे आवश्यक असणार आहे.
वादग्रस्त प्रकरणे गाजण्याची शक्यता
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर विरोधक गदारोळ घालण्याची शक्यता आहे. त्याबरोबरीने सीमाप्रश्नावर देखील विरोधक राज्य सरकारवर तोंडसुख घेण्याच्या तयारीत असणार आहेत. त्याबरोबरीने शेती, अवकाळी पावसाने केलेले नुकसान, सरकारी मदत, आदी गोष्टींवर देखील विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्याबरोबरीने राखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील विरोधक बोट ठेवत राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात.
शिंदे – फडणवीस यांची ‘बॅटिंग’ महत्वाची
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्याकाळी त्यांनी अनेकदा बॅटिंग करताना विरोधकांचा पुरता घाम काढला होता. यावेळी देखील फडणवीस पीचवर असले तरी स्ट्राईकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. शांत आणि मवाळ असणारे शिंदे, विरोधकांच्या यॉर्करला असे टोलावतात यावर सरकारचा धावफलक कसा असणार आहे ठरणारे आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस ही जोडी विधीमंडळात कशी बॅटिंग करते, यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.