पुणे : श्रीलंका सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथील राष्ट्रपती भवन जनतेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे आज सकाळी कोलंबोहून मालदीवला पळून गेल्याचे वृत्त आहे. ते पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह हवाई दलाच्या विशेष विमानातून देशातून पळून गेले आहे.
आज गोटाबाया अध्यक्षपदाचा राजीनामा देणार होते. राष्ट्रपती देश सोडून गेल्याच्या वृत्ताने आंदोलक पुन्हा भडकले आणि हजारो आंदोलक संसद आणि पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. दरम्यान, श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयावर कब्जा:
श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयावर आंदोलकांनी ताबा मिळवला आहे. आंदोलक आवारात घुसले असून कार्यालयाच्या छतावर श्रीलंकेचा ध्वज फडकावत आहेत.
रोखण्यासाठी हवाई गोळीबार :
कोलंबोतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या हजारो निदर्शकांना रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केला. निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सुरक्षा जवानांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.
गोटाबाया राजीनामा सादर करणार :
श्रीलंकेतील अनियंत्रित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आज आपला राजीनामा सादर करतील. 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षांची निवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकन दूतावासाने केली दोन दिवस सेवा बंद :
या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावासाने श्रीलंकेतील आपली सेवा दोन दिवसांसाठी बंद केली आहे.
राष्ट्रीय वाहिनीने प्रक्षेपण बंद :
राष्ट्रीय टीव्ही चॅनल रूपवाहिनी कॉर्पोरेशनने श्रीलंकेतील प्रसारण बंद केले आहे. कोलंबोतील टीव्ही चॅनलच्या कार्यालयाला चारही बाजूंनी आंदोलकांनी घेराव घातला असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत वाहिनीने प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलकांवर फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या :
श्रीलंकेतील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. देशाचे भविष्य शिल्लक आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान जोरदार प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांवर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत.
काळजीवाहू अध्यक्षांबद्दल विरोधकांचे प्रश्नचिन्ह :
गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर रनिल विक्रमसिंघे यांना श्रीलंकेचे हंगामी राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आले आहे. यावर आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा म्हणाले, “जेव्हा राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात आणि त्यांचे पद रिक्त होते तेव्हाच पंतप्रधान काळजीवाहू अध्यक्ष बनतात.” याशिवाय संसदेच्या सल्ल्यानुसार सरन्यायाधीश पंतप्रधानांची कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करतात. त्यांच्याशिवाय पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करू शकत नाहीत आणि कर्फ्यूची घोषणा करू शकत नाहीत.