मुंबई : सीबीआयने दाखल केलेल्या जामीनावरील स्थगिती वाढविण्याचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मुंबईबाहेर जाता येणार नसल्याची अट न्यायालयाने घातल्याने अनिल देशमुख यांना सध्या नागपूर येथे सूरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना अनिल देशमुख यांना काही अटी व शर्थी घातल्या आहेत. देशमुख १३ महिने आणि २६ दिवसांपासून आर्थर रोड, तुरुंगात होते. जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी नागपूर विभागात जल्लोष केला होता. परंतु न्यायालयाच्या शर्थीने समर्थकांना देशमुख मतदारसंघात येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
सध्या नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. आज देशमुख तुरुंगातून सुटल्यावर अधिवेशनात सहभागी होणार का ? असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत होता. मात्र, देशमुख यांना तीन महिने मुंबई सोडता येणार नसल्याने, देशमुख विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता धूसर आहे.
अजित पवार दुपारी होणार मुंबईला रवाना
नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे दुपारी मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज अनिल देशमुख देखील तुरुंगातून बाहेर येणार असलयाने अजित पवार व अनिल देशमुख यांची भेट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अजित पवार कोणत्या कारणासाठी मुंबईत दाखल होणार आहेत, हे अजून स्पष्ट झाले नाही.