नागपूर : गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी जोरदार घोषणाबाजी बुधवारी (ता.२८) रोजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहीत पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही विरोधकांनी निशाणा साधत ‘नागपूरचे संत्री, भ्रष्टाचारी मंत्री’, अशा घोषणा दिल्या आहे. यावेळी आमदारांच्या हातात संत्रीही होते. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन गायरान जमीन घोटाळा प्रकरणात काल मंत्री अब्दुल सत्तार विधानसभेत आपली बाजू मांडणार होते. मात्र, मंगळवारी अब्दुल सत्तार विधानसभेत काहीच बोलले नाहीत.
दरम्यान, कोरोनामुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे विदर्भाच्या मुद्द्यांना अधिवेशनात न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दोन आठवड्यांचे हे अधिवेशन तीन आठवड्यांचे करावे. जेणेकरुन विदर्भ, मराठवाडा, शेतकरी तसेच इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करता येईल, असे देखील अजित पवार म्हणाले आहे