Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्मयाआधीच हाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. आमच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील असं महाविकास आघाडीने म्हटलं असून दुसरीकडे महायुतीने सुद्धा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असा दावा त्यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाविकासआघाडीला ‘इतक्या’ जागा मिळणार..
“मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे”, अशा हालचाली सध्या सुरु असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.