पुणे : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी (दि.04 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बंडखोरांनी माघार घ्यावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे रविवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते. आज दुपारनंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला पक्षांतर्गत बंडखोरांची चिंता लागली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 288 जागासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या 7066 इतकी आहेत. यात बंडखोर उमेदवारांची संख्या जास्त आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील प्रमुख पक्षात खरी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या होती. पक्ष प्रमुखांना प्रत्येकाला संधी देता न आल्याने अनेकांनी बंडाचे हत्यार उपसले.
राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणजे माहीम मतदार संघ आहे. या मतदार संघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीतील सदा सरवणकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी त्यांच्यावर अनेकांनी दबाव आणला. मात्र, सरवणकर हे निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा घोषित केला आहे. अशा स्थितीत आज सरवणकर काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बोरिवली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्याविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. शेट्टी यांना पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही शेट्टी यांनी अर्ज मागे घेणार की नाही, हे स्पष्ट केले नव्हते. शेट्टी यांनी निवडणूक लढवली तर त्याचा थेट फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी शेट्टी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.