नाशिक : शिंदे गट आणि भाजपा यांच्यावर काल संजय राऊत यांनी नाशिकमध्ये जोरदार शाब्दिक हल्ला केला होता. हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी हल्लाबोल करून मुंबई गाठण्याआधीच नाशिकमधील ठाकरे गटाचे ११ माजी नगरसेवक, पदाधीकारी व मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपवर टीका करून संजय राऊत यांनी नक्की काय साधले हेच सामान्य शिवसैनिकांना कळत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
आज (शुक्रवार) सकाळी ८ वाजता शिवसेनेचे ११ माजी नगरसेवक, पदाधिकारी व मनसेचा एका पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. काल खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये शिंदे गट व भाजपावर आगपाखड केली होती.
त्यामुळे संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर देखील ठाकरे गटातील पडझड रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. ठाकरे गटाचे नाशिक येथील विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे शिंदे गटाची नाशिक मधील ताकद वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे.
ठाकरे गटातील विरोधी पक्षनेते अजय बोरसे, नगरसेवक नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, माजी स्थायी समिती सभापती आर. डी. धोंगडे, नगरसेवक ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खरजुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे आणि मनसेचे सचिन भोसले यांनी आज (शुक्रवार) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिंदे गटात प्रथमच नाशिकमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर झालेले इनकमिंग शिंदे गटाला मजबूती देणार आहे. संजय राऊत यांनी पंधरा दिवसात दुसऱ्यांदा नाशिकचा दौरा केला होता. यात त्यांनी नाराज पदाधिकारी व नगरसेवक यांची प्रत्यक्ष भेट घेताना मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा प्रयत्न सपशेल फसला असलयाचे या प्रवेशाने अधोरेखित झाले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अजून इनकमिंग होण्याची चिन्हे दिसत असल्याने पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची चर्चा नाशिककारांमध्ये रंगत आहे.