दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुका हा द्राक्ष व इतर फळबागांच्या उत्पादनात राज्यामध्ये अग्रेसर आहे. द्राक्ष व इतर फळांच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा यासाठी निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान वाढविणे, जीएसटीत बदल करणे आदी अडचणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचेकडे मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोरी (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (ता . १०) बोलताना दिली आहे.
बोरी येथे रामनाना शिंदे आणि भारत शिंदे यांच्या कोल्ड स्टोरेजला हर्षवर्धन पाटील यांनी भेटी देऊन पाहणी केली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना वरील ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. यावेळी रामनाना शिंदे व भारत शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते
पाटील पुढे बोलताना म्हणाले, बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी कष्टाने व जिद्दीने द्राक्ष व इतर फळबागांचे दर्जेदार उत्पादन घेत आदर्श निर्माण केला आहे. राज्यामध्ये शेततळ्यांचे गाव म्हणून बोरीची ओळख निर्माण झाली आहे. कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्ष व फळे साठवणुकीसाठी मोठी मदत होत आहे. द्राक्ष, फळांसाठी निर्यात अनुदान वाढविणे, वाहतूक अनुदानातील अडचणी दूर करणे, जीएसटी रक्कम कमी करणे आदी संदर्भात केंद्र सरकारकडे प्रयत्न पाठपुरावा केला जाईल. तसेच राष्ट्रीय फळबाग लागवड योजनेतील त्रुटी दूर करणेसाठी केंद्राकडे प्रयत्न करू, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
इंदापूर तालुक्यात सुमारे सात ते आठ हजार शेततळी आहेत. सन २०१० ते १४ या काळात आपण मंत्रीपदी असताना एका-एका दिवसामध्ये हजारोंच्या संख्येने शेततळ्यांना मंजुरी दिली आहे. तसेच रोजगार हमी योजना खात्याचे मंत्रीपद माझ्याकडे असताना त्या योजनेतून शेततळे उभारणीसाठी धोरणात बदल केल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
इंदापूर तालुक्यात प्रक्रिया उद्योगाची खरी गरज – हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुक्यात फळ, भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामधून शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळण्यासाठी तालुक्यात प्रक्रिया उद्योगाचे युनिट उभारण्याची गरज असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले आहे.