नाशिक : नाशिकमधील सुमारे ५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशनाने नाशिक येथील ठाकरे गटाला सुरु असलेली गळती थांबत नसल्याचे चित्र आहे.
खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर असताना शिंदे गटातने हा मोठा धक्का दिला आहे. आज सकाळी ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी देखील संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. मात्र संजय राऊत यांची पाठ फ़िरतांच १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. गळती रोखण्यासाठी जानेवारी अखेर उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. मात्र, त्या आधीच पुन्हा पक्षाला गळती लागली आहे.
नाशिकमधून आतापर्यंत शिंदे गटात दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील 12 माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली आहे.
चौकट : परभणीचे माविआचे ३० नगरसेवक शिंदे गटात
तर परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.