नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी केली होती. यावेळी सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांनी घोषणाबाजीच्या वेळी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्षांसोबत त्यांची बैठक पार पडली आणि जयंत पाटील यांच्या अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना आज सलग चौथ्या दिवशी देखील रंगला आहे. बोलू दिलं जात नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करु नका, असं म्हणत जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला होता. यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे.
त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यामुळे ‘अध्यक्ष महोदय, तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे जयंत पाटील म्हणाले होते. अजित पवार यांनी देखील ‘अध्यक्ष तुम्ही सत्ताधाऱ्यांना पाठिशी घालू नका’, असे देखील म्हटले होते. पण जयंत पाटलांच्या निर्लज्ज या असंसदीय शब्दावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.