Sushma Andhare : पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. व्हिडीओ हा पोलिसांशी संबंधित आहे. या व्हिडीओवर इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या व्हिडीओवरुन सुषमा अंधारे यांच्यावरच निशाणा साधलाय.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओत पोलिसांची एक गाडी दिसत आहे. या गाडीत कैद्यांना काहीतरी पाकिटे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सुषमा अंधारे यांनी या व्हिडीओवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोर्टातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकिटे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली”, असं म्हणत सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा आहे, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय.
नाना पटोलेंची टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. “सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्विट केलेलं नाही. जेलमध्ये बसलेल्या बगलबचच्यांसाठी सुविधा मिळत आहे. हे फक्त यरवडाबद्दल नाही. हे गुन्हेगार आणि माफिया यांना संरक्षण देणारं सरकार आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया
सुषमा अंधारे यांच्या ट्विटवर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. “पोलीस पैसे घेत आहेत हे काय नवीन नाही. राज्याचं गृहखात काम करण्यासाठी कमी पडत आहे. यांची भाषण खोटी आणि आश्वासन देखील खोटीच”,अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.