Sushma Andhare : नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनात आज नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना घेरलं आणि ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर ते तोंडघाशी पडल्याचे पहायला मिळाले. विधीमंडळ अधिवेशनात बडगुजर यांचे काही फोटो दाखवले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम कुर्लाबरोबरचे कथित फोटो दाखवून राणे यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असं जाहीर केलं. आता सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे या बडगुजर यांचा बचाव करण्यासाठी पुढे आल्या आहेत. सुषमा अंधारे यांनीदेखील प्रसारमाध्यमांना काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले. यामध्ये भाजपाचे अनेक नेते सलीम कुर्लाबरोबर त्या पार्टीत दिसत होते. सुषमा अंधारे म्हणाल्या, “हे फोटो आणि व्हिडीओ त्याच पार्टीतले आहेत, ज्याचे फोटो नितेश राणे यांनी दाखवले होते.”
त्या पार्टीत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, विकांत चांदवडकर असे सगळे लोक दिसत आहेत. ती कोणाच्या तरी हळदीची की लग्नाची पार्टी होती. त्यामधील आमच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवून नितेश राणे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, नितेश राणे यांना माहिती नसावं की हा फोटो दाखवल्यामुळे ते किती जोरात तोंडघशी पडतील. त्या पार्टीत हे सगळे भाजपा नेते काय करत आहेत? त्याचंही उत्तर राणे आणि भाजपा नेत्यांनी द्यावं.