मुंबई : घरकुल घोटाळा प्रकरणी जामीन मिळालेले माजी मंत्री सुरेश जैन याची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली त्यानंतर त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात आले असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
काल रात्री त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र काही वेळाने येथिल डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना मुंबईला हलविण्यात आले.
सुरेश जैन यांना न्यूमोनियाची लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घरकुल घोटाळ्या प्रकरणी काही दिवसापूर्वी त्यांना जामीन मिळाला होता, ते कारागृहातून बाहेर आल्यावर जळगाव रेल्वे स्थानकापासून ते त्यांच्या गाडीपर्यंत रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले होते. जैन पुन्हा राजकारणाच एन्ट्री घेतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आपण राजकीय संन्सास घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले होते.