पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचं वेळीच लक्षात आल्याने ही आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. पुण्यातील हिंजवडी परिसरात एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यावेळी खासदार सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील एका कराटे कोचिंग क्लासेसचं आज उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुळे यांनी दीप प्रज्वलन केलं आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सुप्रिया सुळे यांच्या साडीने दिव्यामुळे पेट घेतला. अचानक लागलेली ही आग कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने वेळीच विझवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, या घटनेनंतरही सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमातून निघून न जाता तिथंच थांबणं पसंत केलं. तसंच खासदार सुळे यांचे दिवसभरातील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.