पुणे : काही दिवसांवर रक्षाबंधन सण आला आहे. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. या सणाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आता रक्षाबंधनाच्या दिवशी काय होणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
सुप्रिया सुळेंनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी ‘कळेल’, असे एका शब्दात उत्तर दिलं आहे. तसेच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार यांनी नुकतीच सुप्रिया सुळेंच्या विरोधात मी सुनेत्राला उभं करायला नको होतं म्हणत चूकही मान्य केली. “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली.
मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होते. पण त्यावेळेस झालं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं.” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या अजित पवार यांना राखी बांधणार का? हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं आहे.