(Supriya Sule) इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील अपंग व्यक्तींसाठी दिव्यांग ही संकल्पना मांडली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाल्याचे दिसते. याच धरतीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता ”गंगा भागीरथी” हा शब्दप्रयोग वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी दिले आहेत. यावरून सर्वत्र साधक बाधक प्रतिक्रिया उमटू लागले आहेत.
याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणल्या…!
“मंगलप्रभात लोढा वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याबदबल मला आदर आहे. मला आश्चर्य वाटले, त्यांच्याशी मी फोनवरुन संपर्क करणार आहे. यात खरंच वेगळे काही करून आदेश काढण्याची गरज आहे का ? श्रीमती हा शब्द वापरला जातो. तुम्ही त्यांना प्रेमाने काहीही म्हणू शकता परंतु सरकारने आदेश काढून नावापुढे काहीतरी लावणे म्हणजे त्यांना वेगळे करणे आहे.”
विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. पण त्याआधी गं. भा. लावाच असे सरकारनं सांगणे. एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता. हा महिलांवर अन्याय नाही का? असे प्रतिप्रश्न यावेळी सुळे यांनी उपस्थित केले.
आदित्य ठाकरे खरे बोलतात …
“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये गेले नाही तर जेलमध्ये टाकतील. असे म्हणत मातोश्रीवर रडले. असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगून त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडेल असे वक्तव्य नुकतेच केले आहे. याबाबत सुळे म्हणाल्या की, मी आदित्य ठाकरेंना चांगले ओळखते. तो एक सुसंस्कृत मुलगा आहे. त्याच्या घरी जो प्रसंग घडला आहे. तोच प्रसंग जर सांगितला असेल तर तो खराच असेल अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.”
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या अटकेबाबत टांगती तलवार आहे. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. विरोधकांबाबत अशा घटना होतच असतात. अशी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीची नागपूर येथे होणाऱ्या सभेला अद्याप परवानगी मिळाली नाही याबाबत त्यांना विचारले असता सुळे म्हणाले की आमचे प्रयत्न चालू आहेत.