मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह ही सुनावणी प्रलंबित असेपर्यंत वापरता येणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेले ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल चिन्ह तूर्तास कायम राहणार आहे.
“निवडणूक आयोगाने आम्हाला असे सांगितले आहे की जोपर्यंत पोटनिवडणूक चालू आहे, म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंतच तुम्हाला मशाल हे चिन्ह आणि तुमचं नाव मिळू शकेल” पण सुप्रीम कोर्टात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु असल्याने ती संपेपर्यंत तरी आम्हाला चिन्ह आणि नाव वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी केली.
अॅड. कामत यांच्या या मागणीवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यावर होकार दर्शवला. तसेच यासंदर्भात आदेश दिला की, दोन आठवड्यांनंतर यावर सुनावणी होईल. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाचे जे आदेश आहेत त्यामध्ये ठाकरे गटाला काही सुरक्षा दिली जाईल. म्हणजेच काही अटींसह कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय ‘जैसे थे’ असाच ठेवला आहे.