नवी दिल्ली: घड्याळ चिन्हामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे ते गोठवा ही शरद पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाकडून अमान्य करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या गटासाठी घड्याळ हेच चिन्ह राहणार असून फक्त सुप्रीम कोर्टात याबाबत जो अंतिम निकाल येईल, त्याच्या अधीन राहून अटींसह ते वापरता येणार आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह अधिकृत चिन्ह म्हणून तोपर्यंत मान्य करावे, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.
सोबतच अजित पवार गटाने प्रचारात मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये सर्व ठिकाणी हे डिक्लेरेशन देत नमूद करावे की, घड्याळ हे चिन्ह आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या केसवर अटीशर्तींसह मिळालं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला झाल्यावर ते कायम होईल, असंही कोर्टानं म्हटलं आहे.
Supreme Court interim order in Sharad Pawar vs Ajit Pawar case:
– Election Commission to provisionally recognise Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar as party for purpose of contesting upcoming Parliamentary and State elections with symbol of man blowing trumpet
— Bar & Bench (@barandbench) March 19, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी मार्चला सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होत असून त्यांना दुसरे चिन्ह द्यावे, असा युक्तीवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला.
तसेच आम्हाला दिलेले चिन्ह दोन महिने आधी दिले आहे. 25 वर्षांपासून घड्याळ चिन्ह हे खासदार शरद पवार यांच्या नावासोबत जोडले गेले आहे. आता निवडणुकीत मत मागताना घड्याळाला मत द्या, असा प्रचार केला जात आहे. या चिन्हामुळे मतदारांमध्ये गोंधळ होत आहे, त्यांना दुसरे चिन्ह द्या” असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.
यावर “तुमचा पक्ष आता तुमच्या नावाने ओळखला जात आहे. आपल्या देशातील नागरिक हे जागरूक आहेत. त्याचबरोबर ते राजकीय दृष्ट्या ते सक्रिय आहेत, असे कोर्टाने नमूद केले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला “आम्हाला दुसरे चिन्ह नको, घड्याळ हे चिन्ह शरद पवार आणि अजित पवार यांचे नाही, तर घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तो पक्ष अजित पवार गटाला दिला आहे,” असा युक्तीवाद अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहोतागी यांनी केला.