पुणे : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत जबाबदार धरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
भाजप आमदार नमिता मुंदडा, अबू आझमी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभाग्रहात हि घोषणा केली.
बीडच्या अंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना पाठबळ देणे, त्यांना पाठीशी घालणे या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही बदली करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत फडणवीस म्हणाले, “अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत सविस्तर तपास सुरू आहे. त्याबाबतचा एक अहवाल मिळाला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल. त्याचबरोबर तेथील पोलीस उपअधीक्षक यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती केली जाईल.
राज्यातील विविध ठिकाणच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याच्या सूचना पोलीस महासंचालक यांना दिल्या जातील. दोषी आढळल्यास अंबाजोगाई प्रमाणेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांची कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांच्या सीमेला लागून आहे, त्या जिल्ह्यांत अवैध दारूबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.