मुंबई : नगरविकास खात्याने केंद्र सरकारला पाठविलेल्या सहा प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून सुमारे ६५२ कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळणार आहे. तब्बल १ हजार ३०४ कोटी रुपये खर्चून हे प्रकल्प पूर्णत्त्वास जाणार आहेत. यापैकी पहिला टप्पा म्हणजे ६५२ कोटी केंद्र सरकार राज्य शासनाकडे वर्ग करणार आहे. नगरविकास खाते हा निधी एमएमआरडीए, पीएमआरडीए आणि सिडको या विभागांना वळता करणार आहेत. यामुळे राज्यातील सहा प्रकल्पाना गती मिळणार आहे.
या प्रकल्पांत मुंबईतील एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्ग, कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल तसेच बीकेसी ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गिकेचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबईतील सिडको अंतर्गत येणाऱ्या कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजना आणि बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
पुणे विद्यापीठ चौकातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या मेट्रो रेल मार्गिकेसोबत एकत्रित दुमजली उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे. यासाठी केंद्राकडून ३७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
प्रकल्प आणि त्यासाठीची तरतूद :
एमएमआरडीए अंतर्गत
शिवडी वरळी उन्नत मार्गसाठी २५० कोटी रुपये.
कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गासाठी ८७ कोटी ५० लाख रुपये.
बीकेसी ते वाकोला जंक्शनसाठी २२ कोटी ५० लाख रुपये.
पीएमआरडीए अंतर्गत :
– पुणे विद्यापीठ चौकात मेट्रो रेल मार्गिकेसोबत एकात्मिक दुमजली उड्डाणपुलासाठी ३७ कोटी ५० लाख रुपये
सिडको अंतर्गत :
– कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी १२५ कोटी रुपये
– बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी १२९ कोटी ५० लाख रुपये