दीपक खिलारे
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल छत्रपती क्रांती सेनेने पुकारलेल्या ‘इंदापूर बंद’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील व्यापाऱ्यांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवत या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
काही दिवसापूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना एका राजकारणाशी केली होती. त्याच दिवसापासून राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखंड देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले हे वक्तव्य जाणीवपूर्वक केले आहे. असे छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
त्याचबरोबर राज्यपालांच्या सुरात- सुर मिसळून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ही वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर बंद पुकारण्यात आला होता.