मुंबई : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात देखील चांगला प्रतिसाद मिळत असताना यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची आवश्यकता नव्हती. यामुळे शिवसेनेला धक्का बसला असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला आहे.
यामुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडू शकते, असे विधान शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. याला येथील नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केले. यांच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.
यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी वरील विधान केले.
इतिहासात काय घडलं, काय नाही, यापेक्षा नवीन इतिहास निर्माण करावा, या मताचे आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले. वीर सावरकर यांना भारतरत्न द्या ही मागणी आम्ही पूर्वीपासून करत आहोत.
मात्र भाजप जे नवीन सावरकर भक्त तयार झाले आहे, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाहीत, असा सवाल करत राऊत यांनी भाजपाला चिमटा काढला.