महाराष्ट्र – “मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता आणि एका कार्यक्रमासाठी ते तिथे जाणार होते. या संदर्भात कर्नाटकचे काही म्हणणे आहे, महाराष्ट्राचही काही म्हणणे आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही. परंतु महापरिनिर्वाणदिनी आपण अशा प्रकारचा वाद तयार करायचा का?” असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
कर्नाटक सीमाप्रश्नाने गेल्या काही दिवसात वातावरण तापले असून त्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र, तो दौरा रद्द झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना विनाकारण या संदर्भात नव्याने कुठलेही वाद निर्माण होणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.
या संदर्भात ‘मुख्यमंत्री’ अंतिम निर्णय देणार आहेत. महापरिनिर्वाणदिन हा आपल्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी एखादं आंदोलन व्हावं, एखादी चुकीची घटना घडावी हे योग्य नाही.” अशी पुष्टी देखील फडणवीस यांनी जोडली.
सीमा प्रश्नावर बोलताना ‘सर्वोच्च न्यायालयात खटला असून महाराष्ट्र अथवा कर्नाटक कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. जो काही निर्णय आहे, तो सर्वोच्च न्यायालय घेणार असून आपण आपली बाजू अतिशय ताकदीने मांडली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.