अजित जगताप
सातारा : पितृ पंधरावडा निमित्त हिंदू धर्मात जे सोडून गेले त्यांचे श्राद्ध घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार खटाव तालुक्यातील शिवसेना कार्यालय वडूज याठिकाणी सेना सॊडून गेलेल्यांना सेनेच्या वतीने शेवटचा घास म्हणून पुरणपोळीचा गोड नैवैद्य देऊन गद्दारांच्या आत्म्याने आता तरी सदविवेकबुध्दीने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यातील सुपुत्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.त्यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. ही सुरुवात असून शेवटही असाच होणार आहे. तर दुसरा पक्ष म्हणजे द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कडू कसा झाला तर संगत नडली? अशी अवस्था झाली आहे. अच्छे दिन न आल्याने यांचा सेवा पंधरावडा म्हणजे पुरावाच आहे. अशी ही कोपरखळी खटाव तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, काही राजकीय पक्ष हे विचार मांडण्याऐवजी मेळाव्यातून शिव्या शाप देत आहेत. हे चुकीचे आहे. त्यांच्याच पक्षातील जेष्ठ कार्यकर्ते आता वैतागले असल्याचे दिसून येत आहे. तशी अवस्था गद्दारांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. असा अनुभव शिवसैनिकांनी सांगितला.
यावेळी नुतन पदाधिकारी संतोष दुबळे,माणिकराव घाडगे, आनंदराव गायकवाड, आबासाहेब भोसले, सुशांत पार्लेकर, सौ सलमा शेख, सौ संध्या चव्हाण, सौ संध्या देशमुख तसेच शिवसेनेत प्रवेश केलेले खटाव तालुक्यातील संतोष यादव, जगन्नाथ सावंत, शुभम इनामदार,प्रशांत माने, बाबुराव सकट, मधुकर मोहिते, राजेंद्र जगदाळे, रोहित शिंदे, चंद्रकात फाळके, धनश्री इनामदार, संभाजी सोनावले,अजय देवकर आदि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात पितृ पंधरा वड्या निमित्त पूजाअर्चा तसेच नैवैद्य व भोजन दान केले जाते. त्याच पद्धतीने खटाव तालुका शिवसेनेच्या वतीने चाळीस गद्दारांच्या चुकीच्या वागणुकीचा समाचार घेऊन घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, सेना उपनेते सुषमा अंधारे, सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव,तालुकाप्रमुख शहाजी राजे गोडसे यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर विश्वास दर्शक ठराव मांडून त्याला एकमताने पाठींबा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ तसेच सेना हितचिंतक उपस्थित होते.नैवैद्य घेण्यासाठी किंवा खाण्यासाठी एक ही कावळा फिरकला नाही,त्याची चांगलीच चर्चा खटाव तालुक्यात सुरू झाली आहे.