संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. यामुळे नवीन वादाला तोंड फुटणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय भूपृष्ठ वहातूक मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या वतीने नितीन गडकरी व शरद पवार यांना डी.लिट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असून आजच्या घडीला तुमच्या समोर नितीन गडकरी यांच्यासारखे आदर्श आहेत, असे वादग्रस्त विधान केले.
यामुळे मागील दोन तीन दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात पडत असताना राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आणखीनच वाद चिघळण्याची शक्यता आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून आक्रमक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.