मुंबई : शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल दोन दिवसापूर्वी दादर पोलिसांनी जप्त केले होते.त्यानंतर आता त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना दादर पोलिसांनी समन्स पाठवले आहे.
चौकशीसाठी सरवणकर पितापुत्रांना पोलिसांकडून हजर राहण्याबाबत आदेश दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरवणकर यांच्यावर आर्म्स अॅक्ट नुसार गुन्हा नोंदवला होता.
प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात पाच जणांना अटक करण्यात आली होती.
या राड्याच्या वेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप आमदार सरवणकरांनी फेटाळला आहे.त्यानंतर पोलिसांनी त्यांचे पिस्तुल जप्त केले आहे.
गेल्या शनिवारी सकाळी प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव च्या घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले.
यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची रस्त्यावर हाणामारी झाली, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी दावे-प्रतिदावे केले आहे.