पुणे : पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण ते जयंतरावांना भेटतात असा गौप्यस्फोटच शरद पवारांनी केला आहे. “नरेंद्र मोदी यांचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल” असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेला त्यांनी भेट दिली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केली.
पुढे शरद पवार म्हणाले, “आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी यामुळे फटका बसला. सातारा लोकसभा मतदार संघात देखील आम्हाला फटका बसला आहे. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिला. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे.”
राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण, इथं केवळ 8 दिवसात पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, पण संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.