जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला धक्यावर धक्के देत आहेत. अशातच आता शरद पवारांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात एका मात्तबर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे जळगावचे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले दिलीप खोडपे?
दिलीप खोडपे म्हणाले कि, गिरीश महाजन यांच्या विरोधात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहोत. गेल्या १० वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत असल्यामुळे आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असं दिलीप खोडपे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.