देहू, (पुणे) : ‘मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. मोरे घराणे मूळ घराणे आहे. त्यामुळे कुणाचं नाव घेण्याचे काही काम नाही. येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात तब्बल २४ वर्षांच्या कालावधीनंतर शरद पवार यांनी तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पाऊल ठेवले. यावेळी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन उपस्थितांशी पवार बोलत होते. यावेळी तुकाराम पगडी घालून शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या.
यापुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी देव-दानव यापासून लांब असतो. पण काही देवस्थान अशी आहेत जी अंत:करणात आहेत. त्यापैकी म्हणजे देहू, शेगाव, आळंदी. देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं, आपण वारी केली नाही, पण त्याचा अनादरही केला नसल्याचं विधान काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी केलं होतं. कधी पंढरपूरला गेलो तर जास्त जणांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय महापूजा चुकवली नाही, असं शरद पवार म्हणाले होते.
दरम्यान, ‘मी वारीपासून लांब असतो असं बोललं जातं. पण मला कोणत्याच गोष्टीचं अवडंबर केलेलं आवडत नाही. कधी पंढरपूरजवळ गेलो तर फार लोकांना बरोबर घेऊन न जाता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. याचे फोटो प्रसिद्ध व्हावेत, अशी माझी इच्छा नसते. राज्याची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा कधीही शासकीय पूजा चुकवली नाही,’ असंही एका कार्यक्रमात शरद पवारांनी सांगितलं होते.