(Sharad Pawar )मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. ठाकरे सरकार जावून आता शिंदे सरकार सत्तेत बसले आहे. तरी अद्याप ठाकरेंच्या राजीनाम्याची चर्चा चांगलीच रंगते. ठाकरे यांच्या राजीनाम्यावरुन शरद पवारांनी आता मोठे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही. त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला पाहिजे होते, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. पवारांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत दिली, त्यावेळी ते बोलत होते.
यामुळे ठाकरेंचा राजीनामा चर्चेला आला आहे. पवारांनी यावेळी अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूस यावरुन रंगलेले राजकारण आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी सध्या चालेल्या राजकारणाच्या परिस्थितीवरु राजकीय नेत्यांचे कान टोचले.
मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करुन तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही, असेे शरद पवार यांनी सांगितलं.
वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये..!
राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरुन भाजप-ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे. वैयक्तिक हल्ले टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये.
हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे, असा सल्ला देत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले.
अदानी प्रकरणात जेपीसीच्या मागणीवर काॅग्रेस ठाम आहे. शरद पवारांनी जेपीसीची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
पवार म्हणाले, ” सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही, मित्राचं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे. मात्र आम्हाला यात ऐक्य ठेवायचं आहे. माझं मत मी मांडलं. पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिजे, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही. याबाबतीत आम्ही आग्रह धरणार नाही.”