पुणे : शाहिरी व तमाशा या लोककलेला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. चोरून तमाशाला जाणारी माणसेही बघितली आहेत, पण ही चोरून बघण्यासारखी कला नाही. डोळे लावून व डोळे फाडूनही याकडे पाहतात.
डोळे फाडून बघणं हा विकार आहे तर डोळे लावून बघणं यात पावित्र्य आहे. आपली संस्कृती जपणं हे आपल्या हातात आहे. ही संस्कृती तुम्हा रसिकांनी जपावी असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. लोकनाटय़ कलावंत अमन तांबे पुणेकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार, लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना भास्करराव खांडगे पुरस्कार व प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ सिने अभिनेत्री लीला गांधी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक मारुती तुपे, योगेश ससाणे, बंडू गायकवाड, माजी नगरसेविका उज्वला जंगले, साधना बँकेचे संचालक सुरेश घुले, महादेव कांचन, अविनाश तुपे, राहील तांबे आदी उपस्थित होते.
शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार २१ हजार रुपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार १५ हजार रुपये आणि बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, अध्यक्ष देविदास पाटील व मित्रावरूण झांबरे, डॉ शंतनू जगदाळे, रेश्मा परितेकर, रामदास खोमणे, संदीप घुले, बापू जगताप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘शुभमंगल चरणी गण नाचला …’ या शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या गणाने उमेश बारभाई यांनी या महोत्सवाची सुरुवात केली. उत्कृष्ट पदलालित्याचे दर्शन सादर करीत, एकास एक लावण्यांचे सादरीकरण करीत लावणी कलावंतांनी लावणी महोत्सवात रंगत आणली.
‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली..’ या पप्पू बंड ग्रुपने सादर केलेल्या भैरवीने लावणी.महोत्सवाची सांगता झाली. सुनिता अनिता नेर्लेकर, फिरोज मुजावर, काजल भोंगे, शाहीर सगनभाऊ ग्रुप जेजुरी, पुष्पराज कलाकेंद्र जेजुरी,रेश्मा वर्षा परितेकर पार्टी, आदी संगीत पार्ट्यानी रंगत आणली. महोत्सवाची सांगता पप्पू बंड यांनी सादर केलेल्या भैरवीने झाली.
स्वागत जयप्रकाश वाघमारे, प्रास्ताविक मित्रावरूण झांबरे, आभार रेशमा परितेकर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक वाघमारे यांनी केले.