नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेकडून सत्ता ताब्यात घ्यायची, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही जोरदार तयारी केल्याचे समजते.
महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घोषणेनंतर ‘आघाडी की एकला चलो रे’ हा पक्षातील गोंधळ निस्तरण्यासाठी आज (ता. २७) प्रदेश आणि केंद्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावे, अशी भूमिका काँग्रेसच्या अन्य नेत्यांची आहे.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत या महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्याचीच काँग्रेसची भूमिका असली पाहिजे, असे पक्षातील नेते म्हणत आहेत.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली रणनीती ठरवायला हवी. राष्ट्रीय राजकारण करणाऱ्या अमित शहा यांनी ज्या प्रकारे हैदराबाद महापालिकेमध्ये ताकद पणाला लावली होती.
त्याची पुनरावृत्ती मुंबई महापालिका निवडणुकीतही होऊ शकते. हे लक्षात घेऊन महापालिकेवर भाजपला कब्जा मिळवता येऊ नये हा काँग्रेसचा प्रयत्न असायला हवा. महाविकास आघाडी होणे किंवा न होणे हा मुद्दा बाजूला ठेवून भाजपला रोखणे यालाच प्राधान्य हवे, असे मतप्रदर्शन या नेत्याने केले. तर, अन्य एका नेत्याने नाना पटोलेंचे विधान कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी होते, धोरणात्मक निर्णय अद्याप झाला नसल्याचे म्हटले आहे.
आगामी निवडणुकीच्या मुद्द्यावर राज्यातील नेत्यांची बैठक संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत उद्या काँग्रेस मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच दिल्लीत असलेले महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यांचीही मते जाणून घेण्यात येणार असल्याचे समजते.
गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुंबईच्या दौऱ्यामध्ये महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना उद्धव ठाकरेंना धडा शिकविण्याचे विधान केले होते. त्यानंतर भाजपने शिंदे गटाच्या मदतीने या निवडणुकीची आखणीही केली आहे.