अहमदाबाद : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. गुजरातच्या ९३ जागांसाठी आज मतदान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांगेत उभे राहात आपला मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठीचे मतदान १ डिसेंबर रोजी पूर्ण झाले आहे.
यावेळी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होताना दिसून येत आहे. आजच्या ९३ जगण्यासाठी तीनही पक्षाचे मिळून ८३३ उमेदवार रिंगणात आहेत. आजच्या टप्प्यातील १६ जागा या भाजपासाठी महत्वपूर्ण आहेत. सन १९९० सालापासून या जागांवर भारतीय जनता पक्षाचेच उमेदावर निवडून आले आहेत.
सन २०१७ साली झालेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने सरकारची स्थापना केली होती. यावेळी आम आदमी पक्षाने देखील पंजाबनंतर गुजरातमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आम आदमी पक्षाचा नक्की कोणत्या जागांवर आपली ताकद लावणार, कुणाची मते खाणार, यावर अनेक गणिते अवलंबून आहेत.
भाजपासाठी गुजरात हे सर्वात महत्वाचे राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा गुजरातचे नेतृत्व केले आहे. सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील गुजरातमधूनच लोकसभेवर निवडून गेले आहेत.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात देखील अमित शहा यांचा सहभाग होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना गुजराती मनाचा पूर्ण ठावठिकाणा आहे.