नागपूर : समृद्धी शुगरचे चेयरमन सतीश घाडगे पाटील यांनी नागपूर अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. साखर कारखानदारी क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी घाडगे पाटील यांना प्रवेश दिला असल्याचे बोलले जात आहे.
परभणी लोकसभा तसेच जालना जिल्ह्यातील घनसांगवी विधानसभा यांच्या दृष्टिकोनातून सतीश घाडगे पाटील यांचा प्रवेश महत्वाचा आहे. परभणी लोकसभा क्षेत्रात दोन साखर कारखाने असणारे घाडगे हे भाजपासाठी गेमचेंजर म्हणून काम करू शकतात. घाडगे यांनी देखील आपली ताकद नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली होती. समृद्धी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच घाडगे यांनी घनसावंगी विधानसभा मतदार संघात २१ पैकी १३ ठिकाणी सरपंचपद पटकावले.
परभणी जिल्ह्यात तसेच जालन्यातील घनसांगवी या विधानसभा मतदार संघात घाडगे यांची चांगली ताकद आहे. घनसांगवी हा राष्ट्रवादीची मात्तबर नेते तसेच राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे. परभणी लोकसभा क्षेत्रात देखील दोन साखर कारखाने असल्याने तेथे देखील घाडगे यांचा मोठा जनसंपर्क आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील सतीश घाडगे पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आणण्यासाठीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, घाडगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना सर्वानाच धक्का दिला.