जीवन सोनवणे
खंडाळा, (सातारा) : जल जीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर असणारे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पंधरा दिवसांच्या आत तत्काळ सुरू करा अन्यथा पंचायत समिती समोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिरवळ ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर असणारे नळ पाणीपुरवठा योजना त्याची जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा ज्ञानेश्वर खीलारी यांचे आदेशाने तांत्रिक मंजुरी आदेश वैशाली आवटे (अधीक्षक अभियंता) यांचे आदेशाने निघाला आहे.
त्याचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते झालेले असून आज निवेदेच्या नियोजित जागी वीट सुद्धा रचली गेलेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सदर योजना रद्द व बारगळण्याचा डाव सातारा ग्रामीण पाणी पुरवठा व या योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नियोजित जागी काम सुरू न झाल्यास पंचायत समिती खंडाळा येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.