अजित जगताप
Satara News | वडूज : खटाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला केंद्र बिंदू मानून सर्वच राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. माण-खटाव तालुक्यात तीव्र उन्हाळ्यामुळे प्रचाराला वयोवृद्ध सभासद येऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवार व नेते तीस आणि गावातील सभासद मतदार हजर वीस असे चित्र प्रचारा निमित्त काही ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
खटाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी. अशी सभासदांची इच्छा होती. परंतु, राजकीय शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आघाडी व युती झाली आहे. सुरुवातीला अर्ज दाखल करताना नेत्यांना काही कार्यकर्त्यांनी निवडून येण्याची क्षमता दाखवून दिली नाही आणि ऐन वेळेला आडवी, सरळ, तिरकी, उलटी आघाडी व युती करावी लागल्यामुळे अनेक मान्यवर नेत्यांच्या समर्थक सभासद नाराज झाले आहेत.
बाजार समितीच्या आवारात सदरची वास्तू पहिली तर निवडणूक का? याचेच नवल वाटत आहे. तरीही संस्थेच्या हितासाठी खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून सहकाराचा अभ्यास असलेले माजी आ. प्रभाकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रसचे रणजीतसिंह देशमुख, भाजपचे धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण, काँगेसचे डॉ. महेश गुरव आदी मान्यवरांनी प्रचारला सुरुवात केली आहे.
हम भी कुछ कम नहीं…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाकर देशमुख, नंदकुमार मोरे, प्रा. बंडा गोडसे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी ही एकला चलो रे चा नारा देवुन हम भी कुछ कम नहीं हा दाखवून देण्यासाठी सर्वसाधारण मतदारसंघातून एक उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीचे वारे थंड झाले असून आता प्रचारामध्ये एकसूत्रीपणा आणला गेला आहे. काही नेत्यांनी प्रचारा पेक्षा आपली व्यक्तिगत पातळीची कामे मार्गी लावण्यास धन्यता मानली आहे.
वास्तविक सहकाराच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पळवाट म्हणून राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून आम्ही संस्थेसाठी एकत्र आलेलो आहोत. असे सांगण्याची आता फॅशन झाली आहे. खटाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुवर्णमय कारकीर्दीचा अनुभव घेतलेल्या काही संचालकांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या बाजूला नवीन चेहऱ्यांना संधी देऊन १८ उमेदवारांचे नवीन चेहरे या निवडणुकीत सामोरे आणलेले आहे. सोसायटी ११ ग्रामपंचायत ४ व्यापारी २ हमाल मापाडी १ असे मिळून १८ संचालक निवडून द्यायचे आहेत.हमाल मापाडी मध्ये खटाव तालुक्यात ९६४ व माण मध्ये १ व्यापारी व आडते ८२१ ग्रामपंचायत ११५४ सोसायटी १२९१ अशी मतदारांची संख्या आहे .
व्यक्तिगत हेवेदावे, व्यक्तिगत राजकीय स्पर्धा व राजकारण या भोवती फिरणारी ही बाजार समितीच्या निवडणुकीत भविष्यातील माण- खटाव तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट करतील. तोपर्यंत तत्व खुटीला टांगून बाजार समितीच्या निवडणुकीतील गमती जमती अनुभवयास मिळत आहे. हे मात्र खरे आहे.