जीवन सोनवणे
खंडाळा (सातारा) : यशवंत सेनेचे स्व.बी के कोकरे यांनी धनगर आरक्षणाची ज्योत पेटवलेल्या खंडाळा घाटात तिचे वणव्यामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. त्यानुसार, बुधवारी (ता. २०) खंबाटकी घाट (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे महाराष्ट्रातील धनगर बांधव रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार खंडाळा यांना देण्यात आले आहे.
चौंडी येथील राज्यव्यापी आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बारा दिवसांपासून चौंडीत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव एकवटला आहे. यासाठी रविवारी धनगर समाजातील सर्व आजी, माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांची राज्यव्यापी बैठक झाली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली गेली.
याबाबत बोलताना दोडतले म्हणाले, ही लढाई फक्त यशवंत सेनेची नाही. धनगर समाजाच्या भावी पिढीसाठी हे आंदोलन आहे. ही लढाई समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक हितासाठी आहे. चौंडी येथील पवित्र ठिकाण असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी हे उपोषण सुरू आहे. हा देश घटनेवर चालत असेल तर 47 जातींना अदिवासींची सवलत मिळते मग धनगर समाजाला का नाही? असा सवाल त्यांनी केला.
तसेच आमचा एक उपोषण करणारा सिंह मरणाच्या दारात आहे. हा लढा आजच्या पुरता नाही. धनगर समाजाच्या हाती काहीतरी पडल्याशिवाय माघार घेणार नाही. दोन दिवस वाट बघू. जर आरक्षणाचा तिढा सुटला नाही, तर धनगर बांधव वनवा पेटविल्याशिवाय राहणार नाही. समाज बांधवांनी आजचा संदेश प्रत्येक गावागावात घेऊन जावा आणि आंदोलनाचा लढा व्यापक करावा, असे आवाहन दोडतले यांनी केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब दांगडे, माजी खा. विकास महात्मे, आ. प्रा राम शिंदे, आ. दत्ता भरणे, माजी आ. रामहरी रूपनर, गणेश हाके, भाऊलाल तांबडे, नीतीन धायगुडे, निलम खैरनार, विद्या पोले, हनुमंत पावणे महाराज, किशोर मासाळ, अक्षय शिंदे यांच्यासह राज्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.